एकमेव खुल्या उपळाई गटात भाजप-राष्ट्रवादीत टक्करबार्शी : आॅनलाईन लोकमत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील एकमेव खुला असलेल्या उपळाई ठोंगे मतदारसंघात भाजपचे किरण मोरे विरुद्ध सोशल इंजिनिअरिंग करीत उमेदवारी दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाठक या दोन मातब्बर व एकाच गावातील उमेदवारात होणारी लढत ही लक्षवेधी असून दोन्ही उमेदवार आगळगाव या एकाच गणातील असल्याने मतदारसंघातील सर्वात मोठे गाव असलेल्या उपळाईतून कोणाला कौल मिळणार, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा या दोन्ही तालुक्यांच्या सीमेलगतच्या गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात उपळाई व आगळगाव या दोन पं़स़ गणांचा समावेश आहे़ २०१२ साली या गटावर वर्चस्व मिळविण्यात शिवसेना यशस्वी झाली व जि़प़ला सुमन धस तर पंं़ स़ला विमल खराडे व खुशाल मुंढे हे विजयी झाले़ शिवसेनेने या गटातील आगळगावच्या रतन कांबळे यांना सभापती व यावेळेस खुशाल मुंढे यांना उपसभापती म्हणून काम करण्याची संधी दिली़ त्यापूर्वी आ़ दिलीप सोपल गटाने भीमराव जामदार यांनाही सभापती म्हणून संधी दिली होती़ २८ गावांचा समावेश असलेल्या या गटात मराठा समाजाचे मतदान हे सर्वाधिक आहे, त्याखालोखाल वंजारी, धनगर, लिंगायत,दलित, माळी,मुस्लीम आदी समाजाचे मतदान आहे़ जि़प़साठी भाजपने आगळगावचे शिक्षण संस्थाचालक किरण मोरे यांची उमेदवारी ही सुरुवातीलाच निश्चित केली होती़ तर राष्ट्रवादीकडून मुन्ना डमरे व श्रीरंग शिंदे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आगळगावचेच उद्योजक व पूर्वाश्रमीचे राऊत गटाचे असलेले सतीश पाठक यांना उमेदवारी देऊन गावातच लढत लावली आहे़ मागील वेळेस या मतदारसंघातून राऊत गटाच्या सुमन धस या १८०० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या होत्या़ यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रचाराचा शुभारंभ मोठे गाव असलेल्या उपळाईतून मारुतीला नारळ फोडून केला तर भाजपने नेहमीप्रमाणे आगळगावातील विठ्ठल मंदिरात श्रीफळ वाढवून केला़ या निवडणुकीत चर्चेत असलेली बार्शी उपसा सिंचन योजना देखील याच मतदारसंघात आहे. त्यामुळे तो विषय देखील चांगलाच अजेंड्यावर आहे़ या दोन पक्षांशिवाय खडकोणीचे सरपंच सचिन नलावडे हे शिवसेनेकडून नशीब अजमावत आहेत, मात्र खरी लढत ही दुरंगीच असणार आहे. ---------------------------------उपळाई पं़स़मध्ये मांजरे विरुद्ध मांजरे भावकीतच लढत ४उपळाई पं़स़मध्ये भाजप व राष्ट्रवादी असा दुरंगी सामना होत असून जि़प़प्रमाणेच दोन्ही पक्षांनी एका गावात नव्हे तर भावकीतच उमेदवारी देऊन नवी खेळी खेळली आहे़ राष्ट्रवादीने लेबर फेडरेशनचे संचालक शंकर मांजरे यांना तर भाजपने ग्रा़पं़ सदस्य अविनाश मांजरे यांना आखाड्यात उतरविले आहे़ ही लढत मांजरे विरुद्ध मांजरे अशी वाटत असली तरी माजी पं़स़ सदस्य रामेश्वर मांजरे विरुद्ध जि़प़ सदस्य हनुमंत धस अशीच असणार आहे़ आगळगाव पं़स़मध्ये भाजपने माधुरी सुमंत गोरे यांची उमेदवारी सुरुवातीला निश्चित केली होती तर राष्ट्रवादीने मागील वेळेस पं़स़ लढलेले वंजारी समाजातील उंबर्गेचे सरपंच सुरेखा वालचंद मुंढे यांना मैदानात उतरविले आहे़ ही उमेदवारी देताना आ़ सोपल यांनी मतदारसंघातील वंजारी समाजाच्या मतांचा विचार केला आहे़ त्यामुळे ही लढतही लक्षवेधीच असणार आहे़ ---------------------------या गटात एकूण २८ गावांचा समावेश असून गटात- ३२४४७, उपळाई गण- १७४३३ , आगळगाव गण- १५०४४ एवढे मतदान आहे़ उपळाईत सर्वाधिक तर त्याखालोखाल आगळगावात जास्त मतदान आहे़
एकमेव खुल्या उपळाई गटात भाजप-राष्ट्रवादीत टक्कर
By admin | Published: February 16, 2017 6:55 PM