औरंगाबाद : युती तुटल्याची घोषणा होताच, अध्र्या तासात आघाडी मोडल्याची घोषणा होतेच कशी़, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत उपस्थित केला. शरद पवार व भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याचे मागील 15 ते 2क् महिन्यांपासून गुफ्तगू सुरू असल्याचे मी यापूर्वीच उघड केले होते, असा थेट हल्ला राज यांनी चढविला.
मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी रात्री आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे यांनी भाजपा, राष्ट्रवादीवर प्रथम हल्लाबोल केला. ते म्हणाले की, युती तुटल्याची घोषणा होते आणि अध्र्या तासात आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडते, हा केवळ योगायोग नाही. शरद पवार व भाजपाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या गुफ्तगूचा भंडाफोड मी यापूर्वीच केला होता. मागील संपूर्ण महिना हे चारही पक्ष राज्याच्या प्रगतीबद्दल बोलायला तयार नव्हते. राज्यातील शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई व लोकांच्या जगण्या-मरण्याच्या समस्या संपल्यागत हे पक्ष मागील महिनाभर वागत होते. जागा वाटपाशिवाय त्यांना काहीही दिसत नव्हते.
आघाडीची सत्ता राज्यात 15 वर्षे टिकून राहिली, ती केवळ भाजपा- शिवसेनेच्या छुप्या पाठिंब्यामुळेच, असा आरोप करून ठाकरे म्हणाले की, या लोकांचे हितसंबंध एकमेकांत गुंतले आहेत. त्यामुळेच आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभाराविरुद्ध भाजपा- सेनेचा विरोधी पक्ष काहीच बोलू शकला नाही; परंतु तुम्हाला त्यांचा रागही येत नाही, हेच त्यांचे यश आहे.
मनसेचे सरकार सत्तेत आल्यास महिलांच्या नावावरील घरांना करातून सूट, राज्यात पर्यटन व्यवसायात 2क् लाख तरुणांना रोजगार, राज्यातील सर्व खासगी सुरक्षारक्षक पुरविणा:या कंपन्या बंद करून पोलिसांना समांतर सरकारी सुरक्षा यंत्रणा उभारण्यात येईल, त्यातून किमान 15 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, अशी ब्लू प्रिंट त्यांनी ठेवली.
..तर हे राजकीय दुकान बंद करीन
सुंदर, संपन्न जग महाराष्ट्रात आणण्याचे मी ठरविले आहे. महाराष्ट्राचे भवितव्य घडविण्यात अपयशी झालो तर हे राजकीय दुकान बंद करीन, अशी घोषणा करतानाच सुराज्यासाठी मनसेला एक संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले.