यदु जोशी / मुंबईशिवसेनेबरोबर युती करायचीच असेल तर युतीमध्ये महापौरपद अडीच वर्षे भाजपाकडे घ्या, असा दबाव भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणल्याने आता मुख्यमंत्री काय मार्ग काढतात याबाबत उत्सुकता आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, माजी अध्यक्ष आ. राज पुरोहित आदींनी अडीच वर्षांच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील नेत्यांची युतीबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी महापौरपद आधीच वाटून घ्या, असा आग्रह मुंबईतील नेत्यांनी धरल्याचे समजते. आधी तर हे नेते युतीसाठी राजी नव्हते, शिवसेनेशी चर्चादेखील करू नका, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पण युतीसाठी सेनेशी चर्चा केली जाईल. राज्यात त्यांच्यासोबत सत्ता चालवायची आहे हेही लक्षात घ्या. चर्चाच नको, ही भूमिका स्वीकारली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत शिवसेना अन् भाजपा वेगवेगळे लढले. शिवसेनेने ५४ तर भाजपाने ४५ जागा जिंकल्या होत्या. निकालानंतर सत्तावाटपाचा करार करीत दोघेही एकत्र आले. आधी अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर, नंतर दीड वर्षे भाजपाचा तर शेवटच्या एक वर्षात शिवसेनेचा महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने एकेक वर्षे दोघांनी वाटून घेतले होते.केवळ जागावाटपाच्या आधारे युती नकोकेवळ जागावाटपाच्या आधारे युती होऊ नये. पदांचीपण वाटणी आधीच झाली पाहिजे.महापौरपदाबरोबरच स्थायी समितीचे अध्यक्षपददेखील आधीच वाटून घ्यावे. किमान दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळाले पाहिजे, यासाठीही हे नेते आग्रही होते.
भाजपाला हवे अडीच वर्षे महापौरपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 5:02 AM