“अजित पवारांचा Finance विषय कच्चा आहे, बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:51 AM2022-06-02T09:51:51+5:302022-06-02T09:52:45+5:30
महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
रत्नागिरी: आताच्या घडीला जीएसटी (GST) अनुदान रकमेवरून राज्यातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadhi) ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यांचे सर्व पैसे दिल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत असले, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचे सगळे पैसे मिळाले नसल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. यातच आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर भाजपने खोचक टीका केली असून, बुद्धिवान माणसाकडे हे खाते असावे, असा टोला लगावला आहे.
केंद्र सरकारकडून २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक रक्कम आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा, यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीसाठी या एकूण भरपाईपैकी महाराष्ट्राला १४,१४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, तरीही सगळी रक्कम मिळाली नसल्याचे राज्याचे म्हटले आहे. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
अर्थखातं हे बुद्धिमान व्यक्तीकडे असायला हवं
अजित पवार म्हणतात, GSTचे ५० टक्के पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र ५ लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या ३०/४० हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खाते असावे, असे नितेश राणे यांनी म्हटले. याशिवाय, सगळी चर्चा GSTवर पण ठाकरे सरकारने २ वर्षात २ लाख कोटीचे कर्ज महाराष्ट्रावर लादले आहे, या विषयावर कोण बोलत नाही. २ वर्षात महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारे सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसे हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत, अशी टीकाही नितेश राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली होती. ३१ मे २०२२ पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की, पुन्हा आज १ जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार? राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा-जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची ‘ढकलगाडी’ करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असेही म्हटले आहे.