मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान ही भूमिका पार पाडणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही उल्लेख केला. यावरून नारायणे राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. तसेच "बदल्यात तुमच्या पाया पण पडू" असं देखील म्हटलं आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक माजी विरोधीपक्षांचा उल्लेख करताना नारायण राणेंचाही विशेष उल्लेख केला. "राणेंच्या वेळेस दरारा असायचा. त्यांनी नुसतं मागे वळून बघितलं की सर्व चिडीचूप व्हायचे. सगळे खाली बसायचे. असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कुणाचा बघितला नाही. पण राणेंनी हा दबदबा स्वत: निर्माण केलेला होता" असं अजित पवार म्हणाले. निलेश राणेंनी अजित पवारांच्या भाषणातील हीच क्लिप शेअर करत अजित पवारांचे आता आभार मानले आहेत.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आम्हाला दुसरं काही नको. आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू" अशा कॅप्शनहीत हात जोडणारा इमोजी निलेश राणेंनी वापरला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. डिसेंबर महिन्यात गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होणार होतील, असं भाकीत त्यांनी वर्तवल्याची माहिती आहे. यावरून भाजपाने निशाणा साधला आहे.
"पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग?" असा खोचक सवाल भाजपानेशरद पवारांना (Sharad Pawar) विचारला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??" असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शरद पवारांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणाता आता पुन्हा भूकंप होतो की काय, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिवसेनेतील शिंदे गटाने मोठा बंडाचा पवित्रा घेत भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे.