Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. यानंतर ईडीने संजय राऊतांना न्यायालयासमोर हजर केले. तेथे दोन्ही बाजूने झालेल्या जोरदार युक्तिवादानंतर संजय राऊत यांना ०४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना देत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. रविवारी संजय राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर पुढील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेत असताना संजय राऊत यांनी आपल्या आईला मारलेल्या मिठीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो
निलेश राणे यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत यांनी विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.
दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. रविवारी तब्बल नऊ तास संजय राऊत यांच्यसह पत्नीची चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. राऊत यांच्या आईचे घराच्या खिडकीत उभे राहून आश्रू पुसतानाचे फोटो समाज माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.