मुंबई: अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंची (Sachin Vaze) NIA कडून चौकशी सुरू आहे. सचिन वाझेंनी स्वहस्तलिखित पत्र सादर केले. या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचे वाझेंनी सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही कायदा भंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ५० कोटींची वसुली करण्यास सांगितले होते, असा दावाही सचिन वाझेंनी आपल्या पत्रात (Sachin Vaze Letter) केला आहे. यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (nitesh rane demands anil parab resign over sachin vaze letter)
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी ट्विटरवरून केला आहे.
वकील साहब की तो कल लग गयी
मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वांत एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?, अशी खोचक विचारणा नितेश राणे यांनी दुसऱ्या एका ट्विटवरून केली आहे.
संघनिष्ठ अधिकारी शोधण्यापेक्षा पोलीस खात्यामधील 'वाझे' शोधा; भाजपचा टोला
अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळले
अनिल परब यांनी सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.