BJP Nitesh Rane News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीनेही काही उमेदवारांनी घोषणा केली. यानंतर मात्र महाविकास आघाडीतील धुसपूस समोर आल्याचे दिसत आहे. काँग्रेसने या यादीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला नाराजीवरून फटकारले आहे. यातच या सगळ्या प्रकारावरून भाजपानेमहाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय होणे बाकी असताना उद्धव ठाकरे यांनी दोन जागांवर उमेदवार जाहीर केले. आघाडी धर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणे यामुळे आघाडी धर्माला गालबोट लागले, यावर त्यांनी पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर बाळासाहेब थोरात यांनीही ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
ठाकरे अन् पवारांना मुंबईत काँग्रेस नकोच आहे
नितेश राणे यांनी ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीवरून डिवचले आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काँग्रेस मुंबईत नकोच आहे. काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. मुंबईतील ४ जागांवर ठाकरे गट लढवणार असेल तर, काँग्रेसच्या हाती काय लागणार, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. जे उद्धव ठाकरे स्वतःच्या भावासोबत राहिले नाहीत, ज्यांनी वडिलांचे विचार, धोरणे पुढे नेली नाहीत. संजय राऊतांच्या घरचे होऊ शकले नाहीत, तर हे तुमचे कसे होणार, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, चर्चेला मर्यादा असतात. ती चर्चा आमच्या दृष्टीने थांबलेली आहे असे आम्हाला वाटते. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेक आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचे तर काँग्रेसचा होणार आहे. आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जागा कुठे मागतो तर प्रादेशिक पक्ष म्हणून राज्यात जागा मागतो. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यांचे स्वत:चे स्थान आहे. प्रादेशिक पक्ष राहिले, टिकले तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारले.