मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईउच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा भाजपकडून करण्यात आली आहे. (nitesh rane react on param bir singh case)
मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना या प्रकरणी CBI चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गृहमंत्र्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी पदावर असताना CBI चौकशीला सामोरे जाता कामा नये. त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या लवकर राजीनामा द्यावा. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात वसुली प्रकरणाचा उल्लेख केला होता, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी अवाक्षर काढले नाही
दुसऱ्या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत, या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक अवाक्षरही काढले नाही की, कारवाई केली नाही. CBI ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीच चौकशी का केली नाही, याचाही तपास केला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली आहे.
Param Bir Singh: गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!
दरम्यान, याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने सीबीआय संचालकांना १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असून, यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल, तर FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.