Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लगेचच जामीनही दिला. यानंतर देशभरात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. यातच भाजप नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार करण्यात येत आहे.
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. तसेच कसाबप्रमाणे राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि पाकिस्तानात पाठवून द्या, या शब्दांत राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी यांना तसे विधान करायला आम्ही सांगितले नव्हते. किंवा या विधानाविरोधात याचिका दाखल करण्यासही भाजपने सांगितले नव्हते. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला. मोदी आडनावाचा अपमान केला. कायद्याने आपले काम केल्यावर भाजपच्या नावाने बोंबलायचे, हा कोणता प्रकार, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.
सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा
नितेश राणे यांनी सांगलीसह महाराष्ट्रात लँड जिहाद सुरू असल्याचा दावा केला. अनधिकृत धार्मिक स्थळ उभी करायची. जेणेकरुन हिंदू तिथून निघून जातील, असा प्रकार राज्यात सुरू आहे. मुद्दा यावर कारवाईचा आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली. लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी आम्ही करत आहोत. सामान्य लोकांना याची माहिती व्हावी, यासाठी व्याख्यान आणि प्रबोधनातून प्रयत्न केला जात आहे. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी लव्ह जिहादची खोटी आकडेवारी देत असल्याचा दावाही नितेश राणे यांनी यावेळी केला.
दरम्यान, हिंदू समाज धर्मासाठी कुणावर जबरदस्ती करत नाही. धर्मांतर विरोधात सुरू असलेली ही लढाई सोपी नाही. लव्ह जिहादच्या असंख्य केसेस पोलीस आणि समाजासमोर येऊ शकल्या नाहीत. मुस्लिम तरुण हिंदू आहे म्हणून खोटं सांगून हिंदू मुलींशी लग्न करतात. लव्ह जिहाद करण्यासाठी मुस्लिम तरुणांना लाखो-करोडो रुपये दिले जातात. लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र करणार म्हणजे करणार. महाराष्ट्र सर्वांत कडक धर्मांतर विरोधी कायदा आपल्याला पाहायला मिळेल, असे नितेश राणे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"