राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी "आज आनंदाचा दिवस आहे. साजरा करा. उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका. जांबोरी मैदानात आम्ही परवानगीच मागितली नव्हती. २ वर्षापूर्वी अडीच कोटी फंड देऊन सुशोभीकरण केले होते. उगाच राजकारण आणू नका. निवडणुका येतील तेव्हा येतील. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून बालिशपणा करू नका" असा टोला भाजपाला लगावला आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"उगाच डरकाळी फोडू नका" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते नितेश राणे य़ांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. "वरळीमध्ये भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची हिंमत कोणी करू नये. विधानसभेत साधं मी म्याव म्याव आवाज काढल्यावर काय अवस्था झालेली ही संपुर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून उगाच डरकाळी माऱण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही पण मुंबई तुमच्यासारख्या असंख्य मुंबईकरांची आहे हे लक्षात ठेवावं" असं म्हणत नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.
आदित्य ठाकरे यांनी आज सगळीकडे उत्साह चांगला आहे. लहानपणापासून आम्ही हंडी बघतोय. आज सुरक्षित गोविंदा साजरा होतोय हे चांगले आहे. गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातोय. दहीहंडी सगळीकडे साजरी होते. आजच्या दिवशी मला पोरकट राजकारणात जायचं नाही. आनंदाचा क्षण साजरा करायला. सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या असं म्हटलं आहे.
वरळी मतदारसंघात दरवर्षी जांबोरी मैदानात सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिकाला उत्सव साजरा केला जातो. परंतु यंदा जांबोरीच्या याच मैदानात भाजपानं दहिहंडी उत्सव आयोजित केला आहे. भाजपानं जांबोरी मैदान घेतलं त्यावरून शिवसेनेवर टीका होऊ लागली. ३ आमदार, १ खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळालं नाही अशी टीका भाजपाकडून होऊ लागली. त्यामुळे शिवसेनेतही पक्षप्रमुख नाराज झाले होते. परंतु त्यानंतर श्रीराम मिल चौकात शिवसेनेकडून दहिहंडी उत्सव आयोजित करण्यात आला. त्याठिकाणी आमदार आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती.