मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशी सूचना दिली होती, असा गंभीर आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यानंतर आता भाजपाचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुपारी दिली होती" असं म्हटलं आहे.
"नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी संयमी आणि सुसंस्कृत पक्षप्रमुखांनी सुपारी दिली होती" असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही नितेश राणे यांनी ट्विटमधून दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.
नितेश राणे यांनी "महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असं दाखवलं जात आहे. पण ते जर दुसऱ्याच्या जीवावर उठत असतील, दुसऱ्याला मारण्यासाठी सुपाऱ्या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नाही" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "योग्य वेळी सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली जाईल. काल सुहास कांदे यांनी जी घटना सांगितली. त्यानंतर मी ही माहिती समोर आणली आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ही गोष्ट झालेली नाही" असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"आज सगळीकडे फिरुन उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे की उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत. स्वत:चे वडील आजारी असल्याची चिंता यांनी वाटते पण दुसऱ्यांच्या वडिलांना जेवणाच्या ताटावरुन उठवून अटक करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना काही वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी धमक्या येत होत्या, त्यावेळी राणेसाहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता तासनतास घराच्या बाहेर राहून संरक्षण दिलं आहे. त्याच व्यक्तीला अशा सुपाऱ्या दिल्या" असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.