मुंबई: देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे नाव ठळक करणाऱ्या ज्या घटना गेल्या वर्षभरात घडल्या, त्यामध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या घोटाळ्यांचे संपूर्ण श्रेय ठाकरे सरकारला द्यावेच लागेल. देशभर महाराष्ट्राचे नाव गाजविणाऱ्या सरकारच्या या कर्तबगारीची योग्य ती दखल घेऊन त्यासाठी जबाबदार असलेल्यांचा उचित सन्मान करण्याचे भाजपने ठरविले असून नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी सरकारमधील घोटाळेबाज मानकऱ्यांना घोटाळेरत्न, घोटाळेभूषण, घोटाळेवैभव आणि घोटाळेसम्राट असे पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी घोषणा प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते.
राजेश टोपेंना घोटाळेरत्न पुरस्कार
गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यातील परीक्षा घोटाळे गाजले. हजारो उमेदवारांचे अतोनात हाल करून उमेदवारांचे भवितव्य अंधारात ढकलण्याची कर्तबगारी दाखविल्याबद्दल राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना या सत्कार मालिकेतील पहिला मानाचा ‘घोटाळेरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार या मोहिमेअंतर्गत प्रदान करण्यात येणार आहे, असे उपाध्ये यांनी सांगितले. पक्षातर्फे राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी हा पुरस्कार समारंभपूर्वक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात येऊन घोटाळ्यांचा नवा आविष्कार दाखविल्याबद्दल टोपे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास घोटाळेरत्न पुरस्काराचे पदक प्रदान करण्यात येईल.
अनिल देशमुखांना पुरस्कार होता, पण...
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या परीक्षांचा अभूतपूर्व गोंधळ घालून उमेदवारांच्या मनस्तापास कारणीभूत ठरल्याबद्दल राजेश टोपे यांनी एकदा उमेदवारांची माफीदेखील मागितली होती. घोटाळे करून त्यावर माफी मागण्याचा मोठेपणा दाखविणारे टोपे हे ठाकरे सरकारमधील एकमेव मंत्री असल्याने, ते या सर्वोच्च पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अनिल देशमुख यांनाही हा पुरस्कार देण्याचा भाजपचा मनोदय होता, पण त्याआधीच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागल्याने ते या सर्वोच्च पुरस्कारास मुकले आहेत. त्यांचा योग्य ठिकाणी योग्य तो सन्मान व्हावा अशी भाजपची मागणी आहे असे उपाध्ये म्हणाले.
जीवन गौरव पुरस्कारासाठी जनतेचा कौल घेणार
राजेश टोपे यांच्या आरोग्य खात्याप्रमाणेच, अन्य अनेक खात्यांतील घोटाळेही उघडकीस येत असल्याने, अशा खातेप्रमुख मंत्र्यांनाही विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट अशा पुरस्कारांचा समावेश असून, पहिल्या पुरस्कार सोहळ्याप्रमाणेच या पुरस्कारांचेही सोहळे विविध ठिकाणी साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. घोटाळ्यांच्या मालिकेतील सर्वोच्च मानाचा असा ‘जीवन गौरव पुरस्कार’ही या पुरस्कार मालिकेत प्रदान करण्यात येणार असून त्याचा मानकरी निवडण्याकरिता लवकरच जनतेचा कौल घेण्याची राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे उपाध्ये म्हणाले.
पुरस्कार घेण्यासाठी निमंत्रण देणार
सरकारमधील घोटाळेबाजांच्या कर्तबगारीची दखल घेऊन त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्याचा हा राजकारणातील पहिलाच प्रयोग असल्याचे उपाध्ये म्हणाले. या पुरस्कार सोहळ्यास मानकऱ्यांनी उपस्थित राहावे यासाठी आम्ही त्यांना निमंत्रितही करणार आहोत, परंतु घोटाळ्यांच्या कामाचा ताण लक्षात घेता ते उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास पुरस्काराचे पदक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली.