मुंबई : भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांची पक्षाच्या निवडणूक विभागाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. अलीकडेच भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक विभागाचे प्रमुख म्हणून राज्यातील आगामी सर्व निवडणुकांची रणनीती ठरविण्याची जबाबदारी लोढा यांच्याकडे असणार आहे. भाजपा निवडणूक विभागाकडे राज्यातील सर्व नगरपालिका तसेच पंचायत, विधान परिषद, राज्यसभा तसेच पुढील लोकसभा व विधानसभा निवडणूक अभियानाला गती देण्याचे काम सोपविण्यात आले आहे. निवडणूक विभागप्रमुखपदी लोढा यांची झालेली निवड ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लोढा यांनी आपल्या नव्या जबाबदारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानले आहेत. प्रत्येक निवडणूक विशेष तयारी आणि नियोजनपूर्वक लढण्याचे भाजपाचे धोरण असून स्थानिक पातळीवर पक्षाची क्षमता वाढविणे, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा भाजपाकडील कल वाढविण्यासाठी लोढा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात विशेष प्रचार अभियान चालविण्यात येणार आहे. आगामी काळातील सर्व छोट्यामोठ्या निवडणुकांमध्ये त्याचा चांगला परिणाम दिसून येईल, असा दावा लोढा यांनी केला आहे. मंगल प्रभात लोढा यांनी पाच विधानसभा निवडणुकांमध्ये सलग विजय नोंदविला आहे. १९८९पासून आतापर्यंतच्या एकूण ८ लोकसभा निवडणुकांच्या व्यवस्थापनाचा त्यांना अनुभव आहे. (प्रतिनिधी)
भाजपा निवडणूक प्रमुखपदी आमदार लोढा यांची नियुक्ती
By admin | Published: February 19, 2016 3:37 AM