मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 15 दिवस उलटून गेले आहे. मात्र अद्याप एकाही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवटीचे सावट आहे. शिवसेना-भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता शुक्रवापर्यंत होती. मात्र ही शक्यता देखील आता मावळली आहे.
जागा वाटपात लहान भाऊ झालेल्या शिवसेनेला राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. तर भाजप शतक पार करून मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. मात्र शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. आता हा पेच सोडवणे उभय पक्षांसाठी कठिण झाल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजपची युती निश्चित झाली होती. यावेळी भाजपने आमच्या सर्व अटी मान्य केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील सत्तेचं समसमान वाटप होईल असं म्हटलं होतं. आता मात्र मुख्यमंत्रीपद विभागण्याची योजना नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी मोदींनी उद्धव यांना लहान भाऊ असं संबोधले होते. मात्र राज्यातील सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव लहान भाऊ राहिले नाही का ? किंबहुना भाजप देखील लहान भावासाठी कुठलीही तडजोड करण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीतील भावा-भावाचे नाते केवळ घोषणेपुरतेच होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.