ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ - प्रत्येकाला आमदार, खासदार होण्याची इच्छा असून मंत्रीपदासाठी भाजपाची स्थापना झालेली नाही असे खडेबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री, मंत्रीपद मिळाले म्हणून आता फूलस्टॉप न लावता जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
कोल्हापूरमध्ये भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेल्या ६५ वर्षांत जनतेला काय मिळाल असा सवाल करत नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने देशाला गरीबी दिली, तरुण बेरोजगार आहेत असा आरोपही त्यांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तेवर आलो म्हणजे कार्यकर्त्यांची जबाबदारी संपलेली नाही. आता जबाबदारी वाढली असून जनतेचा आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. येत्या महिनाभरात महामंडळांवर नियुक्ती केली जाईल असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी औपचारीकरित्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.