लोणी काळभोर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील २० हजार शेतकरी सभासदांच्या चुलीशी निगडित असलेल्या हवेली तालुक्यांतील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने भाजपाच्या १५ जणांच्या प्रशासकीय संचालक मंडळाची नेमणूक केली आहे. दरम्यान, संचालक मंडळाच्या यादीमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावून संपूर्ण श्रेय भाजपाने घेतले आहे. संचालक मंडळामध्ये एकालाही स्थान न मिळाल्याने शिवसेनेत नाराजी वाढली आहे.प्रथम यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करा, त्यानंतरच संचालक मंडळाची नियुक्ती करा. या सभासद शेतकऱ्यांच्या मागणीला शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. मात्र सभासदांबरोबरच शिवसेनेच्या मागणीला कात्रजचा घाट दाखवल्याने शिवसेनेतील इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. भाजपातील अनेक इच्छुकांची संचालक मंडळात वर्णी न लागल्याने त्यांची मनधरणी सुरू झाली आहे. या पंधरा जणांच्या प्रशासकीय संचालक मंडळामध्ये सुनील कांचन व अजिंक्य कांचन (उरुळी कांचन), दादासाहेब सातव व पांडुरंग काळे (वाघोली), गणेश कुटे (आव्हाळवाडी), रोहिदास उंद्रे व दादासाहेब ऊर्फ आबा शिंगोटे (मांजरी खुर्द), केशव कामठे (फुरसुंगी), संदेश काळभोर व चित्तरंजन गायकवाड (कदमवाकवस्ती), पूनम चौधरी (सोरतापवाडी), गोरख ससाणे (कोलवडी), अतुल परांडे (परांडेनगर, धानोरी, पुणे), संदीप लोणकर (केशवनगर, पुणे) यांची वर्णी लागली आहे. यांतील उंद्रे माजी उपाध्यक्ष व काळे माजी संचालक आहेत. दोन्ही कांचन माजी संचालकांचे पुत्र आहेत. कुटे तालुकाध्यक्ष, काळभोर जिल्हा व्यापारी आघाडी सरचिटणीस, गायकवाड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष व यांमध्ये एकमेव महिला असलेल्या पूनम चौधरी या महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. हवेली तालुक्याबरोबरच शिरूर, दौंड व पुणे शहरातील काही शेतकऱ्यांचा आर्थिक प्रपंच ‘यशवंत’वर अवलंबून असल्याने राजकीयदृष्ट्या सहकारातील ‘यशवंत’चे वजन प्रतिष्ठेचे मानले जाते. आघाडी सरकार यशवंत सुरू करण्यात अपयशी ठरल्याने येथील मतदारांनी त्यांना मागील लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घरी बसवून बदल घडवला होता. शिवसेना-भाजपाची राज्यात सत्ता आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरूर तालुक्यातीलशेतकरी मेळाव्यात एक महिन्यात यशवंत सुरू करतो, असे आश्वासन दिले. मात्र २ वर्षे उलटूनही मुख्यमंत्रिमहोदयांना त्याचा विसर पडला. मंत्री विनोद तावडे यांनीही विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान यशवंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाचे मंत्री फक्त बैठका घेतात, मात्र यशवंत सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील नाराज होऊन भाजपाविरोधात सूर मिसळत होते. प्रसंगी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून भाजपाच्या मंत्रिमहोदयांना जिल्ह्यात फिरू न देण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. तत्कालीन संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार व त्यामुळे झालेले कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कोणतीही वित्तीय संस्था पुढे न आल्याने थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेल्या ४ हंगामात उसाचे गाळप करू शकला नाही. राज्य सहकारी बँकेने जमीनविक्री केली असती तर सर्व कर्जाचा बोजा उतरून यशवंत पूर्ववैभवात पुन्हा चालू झाला असता. परंतु विक्रीबाबत बँकेस अपयश आल्याने हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे. फेब्रुवारी/ मार्चमध्ये आसवनी प्रकल्प सुरू करून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु पैशाच्या अनुपलब्धतेमुळे तोही बारगळला. जर प्रशासकीय मंडळाची स्थापना झाली तर यशवंत सुरू व्हावा. पैशाच्या उपलब्धतेबाबत नवनवे प्रस्ताव समोर येतील व त्याचा उपयोग यशवंत सुरू होण्यासाठी होणार आहे. यांसाठी या मंडळाच्या स्थापनेकडे शेतकरी सभासद व कामगार या सर्वांचे लक्ष लागले आहे. >यशवंत सभासद शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे दोषी असलेल्या संचालक मंडळाच्या कुटुंबातील सदस्यांची नेमणूक त्याचप्रमाणे बिगर ऊसउत्पादक सदस्यांची संचालक म्हणून केलेली नेमणूक यामुळे राज्यात इतिहास घडला आहे. दोन-अडीच वर्षे यशवंतचे राजकारण करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याने शेतकरीबांधव विसरणार नाहीत.- विकास लवांडे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी >राज्यामध्ये भाजपा-शिवसेनेचे सरकार आहे. मित्रपक्ष असतानाही यशवंतबाबत भाजपाने युतीधर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी मी जास्त काही बोलणार नाही.- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार
‘यशवंत’वर भाजपाचा कब्जा
By admin | Published: October 31, 2016 1:15 AM