मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती अनेक वर्षांपासून आहे. मात्र या युतीला २०१४ विधानसभा निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यातील मोठा भाऊ, छोटा भाऊ वाद चांगलाच गाजला होता. परंतु, निकालानंतर भाजपच मोठा भाऊ ठरला. त्यानुसार भाजपने सत्ता स्थापन करून शिवसेनेला सोबतही घेतले. आता विधानसभा निवडणूक जवळ आली असून पुन्हा एकदा भाजप-शिवसेना यांच्यात जागा वाटपाची बोलणी सुरू झाली आहे. यावेळची बोलणीही गेल्या वेळीप्रमाणेच सुरू आहे. केवळ पक्षांची जागा बदलली आहे. त्यामुळे युतीचं भवितव्य सांगण्याचं धारिष्ट्य कोणी दाखविणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यात भाजपसाठी पोषक वातावरण केले आहे. त्याचवेळी शिवसेनेला सोबत घेण्याची इच्छाही मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र शिवसेनेला द्यावयाच्या जागांवरून भाजपमध्ये विचारमंथन सुरू आहे. किंबहुना शिवसेनेला ११० ते ११५ जागांचा पर्याय भाजपकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येते. अशा स्थितीत शिवसेना यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला छोट्या भावाचीच वागणूक द्यायची, अशी योजना भाजपची आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत देखील असाच पेच होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला १३० हून अधिक जागा देण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यावेळी भाजपची मागणी केवळ १२७ ते १३० जागांची होती. त्याला देखील शिवसेनेने प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते. तेव्हा मोदी लाटेत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता.
दरम्यान २०१४ मध्ये भाजपची जी स्थिती आहे, तीच स्थिती २०१४ मध्ये शिवसेनेची होती. परंतु, काळाचा महिमा मोठा विचित्र असतो, अस म्हणतात. तसंच काहीसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. फरक एवढाच आहे की, यावेळी शिवसेना बॅकफूटला दिसत आहे. तर भाजप फॉर्मात आहे. मात्र दोघांमध्ये कोण सरस हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.