भार्इंदर : जास्त पैशांचे आमिष दाखवून हजारो महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा करिष्मा पुनमिया हिला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रदीप कदम यांनी सांगितले. येथील मॅक्सस मॉल परिसरात असलेल्या कृष्णकुंज इमारतीत पुनमिया हिने पक्ष कार्यालयात २०११ पासून गोल्ड किटी पार्टीचे कार्यालय सुरू केले होते. महिना १ हजार रु. याप्रमाणे ३ वर्षांच्या मुदतीनंतर ४१ हजार रु. देण्याचे आमिष तिने गोल्ड किटी पार्टीच्या गुंतवणूक योजनेद्वारे काही महिलांना दाखविले होते. त्यासाठी सुमारे ५०० महिलांचा एक ग्रुप तयार करण्यासाठी कमिशनवर काही महिला व पुरुष एजंट्सची नियुक्ती करण्यात आली होती. यात घरकाम करणाऱ्या गरीब महिलांसह इतर महिलांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काही महिलांना मुदतीअंती ठरावीक रक्कम देण्यात आली व उर्वरित रकमांचे दिलेले चेक बाऊन्स झाले. तर काहींना उर्वरित रक्कम देण्यासाठी पुनमिया हिने टोलवाटोलवी सुरू केली होती. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक गुंतवणूकदार महिलांनी पुनमिया व तिचा सहकारी राजबीरविरोधात भार्इंदर पोलिसांत १० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुनमियाला ११ फेब्रुवारी रोजी गजाआड केले. (प्रतिनिधी)