मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेतला असून राज्यात सत्तांतर होणार नाही, असं गृहित धरलं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी पक्षांतरावर जोर दिलेला दिसत आहे. आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिवसेनेत या नेत्यांना मोठ्या आदराने सामावून घेतले जात आहे. मात्र यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची परवड होण्याची शक्यता आहे.
मागील अनेक वर्षे विरोधात काढल्यानंतर भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये सत्तेत पुनरागमन करण्यात यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उदयानंतर देशात भाजपचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे. भाजपने अनेक राज्यात सत्ता मिळवली. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले, त्यावेळी अनेक वर्षे भाजपमध्ये घालवणाऱ्या नेत्यांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. परंतु, तेव्हापासूनच भाजपमध्ये विरोधी पक्षांतील नेत्यांची लागलेली रांग वाढतच गेली.
२०१४ मध्ये झालेल्या विजयात भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना संधी मिळाली. या नेत्यांनी विरोधी बाकावर बसून दिलेल्या लढ्यामुळे भाजप-शिवसेनेने राज्यात पाय रोवले. अनेक संकटात या नेत्यांनी भाजपवरची निष्ठा ढळू दिली नाही. मतदार संघातील सत्ताधारी नेत्यांना सळो की पळो करून सोडले त्यांच्यावर कायम टीका केली. परंतु, येणारा काळ या निष्ठावान नेत्यांसाठी त्रासदायक ठरणार, असंच दिसत आहे.
स्थानिक पातळीवर उभी हयात ज्या नेत्यांवर टीका करण्यात घालवली, आज त्यांचाच जयजयकार करण्याची वेळी या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर येणार आहे. पक्षांतर करून भाजपमध्ये दाखल झालेल्या पूर्वाश्रमीच्या शत्रुच्या कार्यक्रमांचे नियोजन या कार्यकर्त्यांनाच करावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच या नेत्यांची परवड होणार हे निश्चितच. तर भाजपने देखील विरोधी पक्षांतील किती नेत्यांना पक्षात सामावून घ्यायचे हे निश्चित करावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.