BJP Opposed Nawab Malik Candidature: भाजपने टेरर फंडिंग आणि मनी लॉड्रिंगचे आरोप केलेल्या नवाब मलिक यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल शेवटपर्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. अखेरच्या क्षणी नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म सादर केला. नवाब मलिक शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, इथे महायुतीचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिकांना पराभूत करण्याचा इशारा दिला आहे.
नवाब मलिकांना उमेदवारी देण्याला भाजपचा विरोध आहेत. त्यासंदर्भात दिल्लीतही बैठक झाली होती. पण, अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून देत मलिकांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलिकांनी मंगळवारी (२९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरण्याचा वेळ संपण्याच्या काही मिनिटं आधी एबी फॉर्म जमा केला.
एकाच मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार
शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी दिली आहेत. त्यामुळे मित्रपक्षांचेच उमेदवार आमने सामने आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले, त्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी लढू
नवाब मलिक हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विरोध केला आहे.
भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टॅग करत किरीट सोमय्यांनी एक पोस्ट केली आहे. सोमय्यांनी म्हटलं आहे की, "शिवाजीनगर मानखुर्दचे महायुतीचे (शिवसेना) अधिकृत उमेदवार बुलेट पाटील हे आहेत. व्होट जिहाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आम्ही लढू", असा थेट इशारा सोमय्यांनी दिला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांचा सोमय्यांनी कुठेही उल्लेख केलेला नसला, तरी त्यांचा थेट रोख मलिकांवरच आहे. सोमय्या हे भाजपचे मुंबई महानगर प्रदेशचे मतदार विशेष संपर्क अभियानाचे प्रमुख आहेत. त्यामुळे भाजप मलिकांविरोधात काम करणार असेच त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.
भाजपने मलिकांवर टेरर फंडिंग आणि मनी लॉड्रिंगचे आरोप केलेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नवाब मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतर सत्ताधारी बाकांवर बसले. त्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून विरोध केला होता. मात्र, मलिकांना अजित पवारांनी सोबत ठेवले.