राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, लोकसभेच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. त्यामुळे ही जागा भाजपा लढवणार की शिवसेना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. मात्र, 21 ऑक्टोबर रोजी ही पोटनिवडणूक होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे आता निश्चित झालं आहे. साताऱ्याची जागा ही सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे भाजपाला ही जागा सोडली जाईल का?
'सातारा लोकसभेच्या विद्यमान खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ताणतणाव कशासाठी करायचा. नंतर पाहूया, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परत जागांचं वाटप होईल. मग, साताऱ्याच्या बदल्यात काय घेता येईल ते पाहू. आधी उदयनराजे भोसले यांना निवडणूक लढवू द्यात, त्यांना जिंकून येऊ द्यात. त्यानंतरचा निकाल आहे तो. सध्या निवडणूक तर होऊद्यात. 'ही युती आहे, युतीमध्ये काय भूमिका असणार,' असं म्हणत संजय राऊत यांनी साताऱ्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसलेंचा पाटोनिवडणुकीत पराभूत करण्याच चंगच राष्ट्रवादीनं बांधलाय. त्यासाठी, खुद्द शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे दिसून येते.