Pankaja Munde News: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस, नव्याने महाराष्ट्रात पाय रोवत असलेला बीआरएस तसेच अन्य पक्षांकडून पंकजा मुंडे यांना ऑफर येत आहेत. पंकजा मुंडेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, तर त्या कोणत्या पक्षात जाऊ शकतील, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यातच आता पक्षाची काय भूमिका असेल ते मला माहिती नाही. परंतु, मला परळीतून निवडून द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच हा एल्गार केल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी बीड येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या विधानाचा धागा पकडून पंकजा मुंडे यांनी पक्षात होणारी आपली घुसमट पुन्हा बोलून दाखवली. गेल्या काही काळात खूप वेगवेगळे अनुभव आले. गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत दूध पोळले. पण आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. मला काही मिळाले नाही की कार्यकर्ते निराश होतात. पालकमंत्री असताना मी भरपूर कामे केली. आता सत्ता असूनही कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशी खंत पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली.
“मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही”; पंकजा मुंडेंचे सूचक विधान
मला परळीतून निवडून द्या
भाजपची भूमिका काय आहे मला माहिती नाही, पण मी मात्र भूमिका घेतली आहे. मला परळीतून आणि राजेंद्र मस्के यांना बीडमधून विधानसभेवर पाठवा असे म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच एल्गार केला. बीड जिल्ह्याला गावकुसाबाहेर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र त्यात कुणालाही यश येणार नाही असे म्हणत माझ्या या संघर्षात कोण कोण सोबत आहे, अशी साद त्यांनी घालताच उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आता सर्वसमावेशक चेहरा झाले आहे
आगामी २०२४ वर्ष हे परिवर्तनाचे, इतिहास घडवणारे आहे. मी आमदार नाही, खासदार नाही. तरीही तुम्हाला वेगवेगळ्या पक्षांकडून ऑफर येतात, असे पत्रकार विचारतात. मला त्याबद्दल काही सांगता येणार नाही; पण मी आता सर्वसमावेशक चेहरा झाले आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा यांच्या या विधानावरून पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी केला आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यानंतर आपण स्वागताचे हार गळ्यात घालून घेणार नाही, असे जाहीर केले होते.