BJP Pankaja Munde News: गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफरही दिली होती. काँग्रेसमधूनही पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आली होती. तसेच पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षाने मोठी ऑफर दिली होती. आपण कुठेही जाणार नाही, भाजपमध्येच राहणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी यांनी स्पष्ट केले होते. अलीकडेच राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली होती. मात्र, याचा फेरविचार करावा, असे आदेश पंकजा मुंडे यांना दिल्लीतून देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीतून निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश
पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे या आणखीनच नाराज झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
दरम्यान, मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.