हिंगणघाट (वर्धा)/ नागपूर - हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) आप्ल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक ट्विट केलं आहे.
'हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला. सुन्न आणि अपराधी वाटत आहे. इतक्या शतकांत आपण स्त्रीला प्रधानमंत्री, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री पाहू शकलो पण सामान्य स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्रीला सुरक्षा नाही देऊ शकलो. फाशी दिली पाहिजे त्या क्रूर अहंकारी तरुणाला. तिच्या परिवाराचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे. ते कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही' असा पवित्रा पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. 'आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही' असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. तसेच 'मुलाला आमच्या स्वाधीन केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही. त्याला देखील जिवंत जाळा. त्याला जिवंत जाळल्याशिवाय मुलीच्या आत्माला शांती मिळणार नाही' अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच 'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झाल्याचे भावनिक ट्विट करत या 'हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, "माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय... महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया."
'जो त्रास माझ्या मुलीला झाला तोच त्रास त्याला देखील झाला पाहिजे. मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. त्याला देखील जिवंत जाळा. निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखं नको, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी' असं पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने देखील म्हटलं होतं.
हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking : SC/ST अॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
हिंदू समाज म्हणजे भाजपा नव्हे, भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही- भैय्याजी जोशी
Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख
हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे
'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी