Pankaja Munde News: इंडिया नव्हे, भारत...!! पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावरून देशभरात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीसह अन्य विरोधी पक्षांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तर, देशातील अनेक स्तरांवरून याचे समर्थनही केले जात आहे. यातच पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट भाष्य केले आहे.
भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळे सत्ताधारी केंद्र सरकारकडून सर्व ठिकाणी भारत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यावरून देशात गदारोळ सुरू आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, तुम्ही इंडियात राहता की भारतात? आपलं नाव भारत आहे आणि इंडिया हे झाले आहे. बॉम्बेच मुंबई होऊ शकते, तर इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
जालन्यातील घटनेची सखोल, निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे
जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. जालन्यातील घटनेची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता नुसती आश्वासने नकोत, तर पोटातून भावना करून एखाद्याने नेतृत्त्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे सांगणारा आश्वासित असा चेहरा समोर आला पाहिजे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उगीचच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द देईल आणि तो शब्द अपूर्ण राहिला तर मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या या परिस्थितीकडे फार चिंतेने पाहते. कोणताही राजकारणी एक मिशन घेऊन समाजातील सर्व लोकांना दिलेला शब्द पाळणारा असतो. मराठा समाजाची उद्विग्नता पाहून मला त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करावसे वाटते. मराठा समाजाला दिलेले शब्द पूर्ण होऊ शकले नाहीत, ही उद्विग्नता त्यांच्या मनामध्ये आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यासाठी न्याय प्रक्रियेत काय निर्णय होईल, यावर मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या होत्या.