BJP Pankaja Munde News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेसाठी बुधवारी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. तर त्यानंतर लगेचच वंचित बहुजन आघाडीच्या आठ उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीत वंचितच्या समावेशाला पूर्णविराम लागला का, अशा चर्चा रंगल्या होत्या. वंचितने उमेदवारी यादी घोषित केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असताना, भाजपा नेत्या आणि उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील व ओबीसी महासंघाचे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्यासोबत चर्चा करून पुढील उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रकाश आंबडेकर यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित यादी २ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येईल. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचेही म्हटले आहे. पहिल्या टप्प्यातील 'वंचित'च्या उमेदवारांना मनोज जरांगे यांचे समर्थन आहे. याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मीडियाशी बोलताना यावर पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला
प्रकाश आंबेडकर प्रभावी नेते आहेत. एका पक्षाचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यांचा या सगळ्या विषयावरील अभ्यास महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी अशी काही भूमिका घेतली असेल, तरी प्रचंड विचारांती घेतली असेल किंवा त्यांना हवा तो सन्मान मिळाला नसेल. प्रकाश आंबेडकर यांनी योग्य भूमिका घेतली आहे. त्यांचा निर्णय योग्य आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महादेव जानकर महायुतीत परतले. त्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आमच्याकडे एक पद्धत आहे. पक्षाच्या लेटरहेडवरून जाहीर केले जात नाही, तोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही. परंतु, त्यांना शुभेच्छा आहेत, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा उमेदवार का जाहीर होत नाही, याची काळजी मी करत नाही. मी बीडवासियांची काळजी करते. माझा विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास, हेच मला निवडणुकीत तारणार, हे माझे ब्रीदवाक्य आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.