Pankaja Munde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यापूर्वी अनेकदा पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असून, पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रचार, बैठका, मेळावे यांवर भर दिला. अशाच एका प्रचारसभेला संबोधित करताना प्रीतम मुंडे यांच्यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले.
प्रचारसभेच्या भाषणात बोलत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी पंकजा मुंडे भावूक झाल्या. मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी ताकद नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या, असे भावनिक विधान पंकजा मुंडे यांनी केले. भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आले. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही. तिचे कुठेही अडणार नाही. प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका. मी तिला नाशिकमधून उभी करेन, असे मोठे विधान पंकजा मुंडे यांनी केले.
ही देशाची निवडणूक आहे
प्रीतम मुंडे यांचे राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात झाले आहे, मी तर गोपीनाथ मुंडेंचा हात बनले होते. मी प्रीतम मुंडेंसाठी तिकीट मागत होते, पण मलाच तिकीट घ्या असे वारंवार सांगितले गेले. त्याचे कारण आता मला समजले, ही देशाची निवडणूक आहे. समोर पौर्णिमेचा चंद्र दिसत आहे. काळे ढग बाजूला गेल्यावर चंद्र प्रकाशला गेला. आपल्या जिल्ह्यावरील काळे ढग बाजूला सारा. या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागली ते मला माहिती नाही. मी एकदा पराभव बघितला आहे. ईश्वरसुद्धा अग्निपरीक्षा घेतो. पाच वर्ष तावून सुलाखून गेले. ४ तारखेचा तो अधुरा राहिलेला किस्सा पूर्ण करायचा आहे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले.
दरम्यान, ही देशाची निवडणूक आहे. आम्ही कधीही जात-पात धर्माचे राजकारण केले नाही. मतदान जरी १३ तारखेला असले तरी निकाल ४ जूनला आहे आणि ३ जूनला गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर पंकजा मुंडेंना निवडून द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.