नांदेड : पीएमसी बँक घोटाळ्यात भाजपाच्या जवळचे १२ महत्त्वाचे लोक गुंतलेले आहेत़ ईडी आणि इतर कारवाईच्या नोटिसा तुम्ही दुसऱ्यांना पाठवता, मग पीएमसी घोटाळ्यात अद्यापपर्यंत सरकारने ठोस कारवाई का केली नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला़
जलयुक्त शिवार ही मूळची काँग्रेसची योजना होती़ या योजनेतून काही चांगली कामे झाली असली तरी यात भाजपा सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला़ त्यामुळे योजनेमागचा हेतू सफल होवू शकला नाही़ आता वॉटरग्रीडच्या नावाने प्रचार केला जात आहे़ मात्र एकीकडचे पाणी काढायचे आणि दुसरीकडे टाकायचे, यातून दुष्काळमुक्ती कशी काय होणार? वॉटरग्रीडच्या नावे मराठवाड्यातील जनतेची निव्वळ धूळफेक सुरू आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
चव्हाण म्हणाले, मी प्रचाराच्या निमित्ताने गावागावांत फिरत आहे़ मात्र एकाही गावात संपूर्ण कर्जमाफी झालेला एकही शेतकरी भेटला नाही. भाजपाने आपल्या संकल्पपत्रात पाच वर्षात एक कोटी रोजगार देण्याची घोषणा केली़ परंतु मागच्या जाहीरनाम्यातही त्यांनी अशीच आश्वासने दिली होती़ त्या आश्वासनांचे काय झाले? रोजगार सोडा, आहे तो उद्योगधंदे बंद पडत आहेत. त्यामुळे बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे़ मात्र सरकार अद्यापही गंभीर नाही़ केवळ विरोधकांना नमविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़