Piyush Goyal News: लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. केंद्रातील अनेक नेते, मंत्री महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुण्यात मोठी प्रचारसभा घेतली. या सभेवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. या सभेवेळी राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा अपमान कदापि खपवून घेतला जाणार नाही, या शब्दांत भाजपा नेते आणि लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी निशाणा साधला.
पुण्यातील सभेवेळी राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा राहुल गांधी यांनी स्वीकार न करता परस्पर इतरांकडे सोपवली, असा दावा करण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, असा आरोपही करण्यात येत आहे. यावरून पीयूष गोयल यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको
महाराष्ट्र हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा आहे. त्यांच्या आदर्शांवर मार्गक्रमण करणारा आहे. काँग्रेसच्या अहंकारी युवराजाने शिवछत्रपतींचा केलेला अक्षम्य अपमान इथे कदापि खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर करणारा नेता महाराष्ट्राला नको, अशी पोस्ट पीयूष गोयल यांनी केली आहे. तसेच पीयूष गोयल यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओतून राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट म्हणून देताना काय घडले, हे दिसत आहे.
दरम्यान, पीयूष गोयल यांनी प्रचारावर जोरदार भर दिलेला दिसत आहे. बोरिवली, दहिसर, मालाडसह अनेक भागांमध्ये नमो रथाच्या माध्यमातून भेटी घेत आहेत. आपले प्रेम हीच माझी प्रेरणा आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या समर्थ नेतृत्वात तिसर्यांदा महाविजय साकार करून विकसित भारताच्या दिशेने मार्गस्थ होऊया, असे आवाहन पीयूष गोयल यांनी केले.