मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल झाले. राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची देखील गच्छंती झाली. त्यांच्या जागी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागली. नवनिर्वाचित थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली असली तरी त्यांना जिल्ह्यातूनच कडवे आव्हान मिळणार, अशी शक्यता आहे. एकूणच थोरातांना जिल्ह्यात अडकून ठेवण्याची योजना तर भाजपने आखली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजी विरोधीपक्षनेते आणि आता भाजपमध्ये सामील होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची जणूकाही जबाबदारीच घेतली आहे. मुलाला भाजपमधून खासदार केल्यानंतर विखे पाटील देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार त्यांनी राज्यात २०० तर अहमदनगरमधून १२-० अशी युतीची स्थिती राहिल असं भाकीत केलं आहे. त्यामुळे राज्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या थोरात यांच्यासमोर अहमदनगरमध्येही चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे.
सध्या तरी भाजपनेते विखे पाटील काँग्रेसमधील नाराज आणि भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांना भाजपमध्ये दाखल करून घेण्यासाठी दुवा ठरत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँग्रेसला चिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.
नगरमध्ये सध्या भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. सहाजिकच पक्षांतर करून आल्यानंतर लगेच मंत्रीपद मिळविणाऱ्या विखे पाटलांवर नगरमध्ये युतीचं संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी असणार आहे. परंतु, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नगरचेच असल्यामुळे विखेंसाठी पक्षाकडून मिळालेले टार्गेट तितकेसे सोपे नाही, हे देखील तेवढंच खरं.