मुंबई : शिवसेना-भाजपातील घटस्फोट जगजाहीर होण्याआधी दोन्ही पक्षांत कुरबुरी सुरूच होत्या. स्वबळाच्या बेंडकुळ्या फुगवत दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेचे वाग्बाण सोडत होते. भाजपाने तर महापालिकेतील भ्रष्टाचार केवळ शिवसेनेचाच असल्याचे ठसविण्याची नीती चालविली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर, इतके दिवस आडूनआडून टीका करणाऱ्या भाजपाने शिवसेनेवर थेट हल्लाबोल सुरू केला आहे. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या नेतृत्वात केलेली प्रगती आणि मुंबईतील विकासकामांच्या प्रचारासाठी शिवसेनेने ‘डिड यू नो’ या थीमवर प्रचारमोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर, ‘आय ट्रस्ट उद्धव ठाकरे’ या थीमवर शिवसेनेकडून प्रचारमोहीम राबविण्यात येत आहे. होर्डिंग, पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. त्याला आता भाजपाने थेट उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. ‘बीजेपी फॉर बीएमसी’ या हॅशटॅगखाली भाजपाने शिवसेनेच्या विकासकामांचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. ‘याला जबाबदार कोण?’ असा प्रश्न भाजपाच्या पोस्टरवर विचारण्यात येत आहे. आता भाजपाला बहुमत द्या, असे आवाहनही करण्यात आले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीने शिवसेनेच्या ‘डिड यू नो’ला उत्तर देण्यासाठी ‘यू शूड नो’ अशी पोस्टर्स झळकवली होती, तर काँग्रेसनेही पोस्टरच्या माध्यमातून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एके काळच्या शिवसेनेच्या मित्रपक्ष भाजपानेही यात उडी घेतली आहे. (प्रतिनिधी)
भाजपाची शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी
By admin | Published: January 28, 2017 3:16 AM