BJP Pravin Darekar News: अनिल परब आणि ठाकरे गटाला उशीरा शहानपण सुचलेले दिसते आहे. २५ वर्षे मुंबईत सत्ता असताना मराठी माणसाचे काय हित साधले त्याचा लेखाजोगा मांडा. अडीच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना का नाही केले? पदवीधर निवडणूक असल्याने, मध्यमवर्गीय पदवीधर माणसाचे मत मिळावे यासाठी, ते बोलत आहेत. मुंबईत मराठी माणसांना प्राधान्य मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे, असे भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडूक होत असून, यावरून दरेकर यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महाविकास आघाडीसहमहायुतीतील मित्र पक्षांच्या नेत्यांनाही प्रत्युत्तर दिले. अमोल मिटकरी यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले. अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. पक्षाने पाहावे, त्यांना काय अधिकार आहे. त्यांची बाष्पळ बडबड असते. मागच्या एका प्रकरणात त्यांना प्रदेशाध्यक्ष यांनी समज दिली होती. महायुतीत तडा जाणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आपण बोलून जाता ते महायुतीला हानिकारक आहे, प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना हानिकारक असल्याचे सांगावे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
रोहित पवारांना देवेंद्रद्वेषाची कावीळ झाली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. सकाळ, दुपार, सायंकाळ देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याशिवाय रोहित पवार यांचा दिवस जात नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा दरारा आहे. या भीतीपोटीच त्यांना टार्गेट केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीने काम करणार आहोत. स्वतः जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता, तुमच्या मागणीवर ते राजीनामा देणार नाहीत. रोहित पवारांना देवेंद्र द्वेषाची कावीळ झाली आहे, असा पलटवार दरेकर यांनी केला.
दरम्यान, कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण देऊ नये अशी तरतूद संविधानात आहे. अशा गोष्टींचा प्रश्न निर्माण करून वातावरण अजून गढूळ करू नका. जातीय तेढ निर्माण होते आहे. आंदोलन करणाऱ्या सर्व नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे सांगत नाना पटोला यांच्या नाना तऱ्हा रोज आपल्याला ऐकायला मिळतात. प्रदेशाध्यक्ष पदाचे भान ठेवायला पाहिजे, असा सल्ला दरेकर यांनी दिला.