मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेदेखील बैठकीत उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले, त्याचवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरू झाली. यावरून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात, असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी अमोल मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे. (bjp pravin darekar replied ncp amol mitkari over cm uddhav thackeray and pm modi meet)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट आणि त्याचवेळी भाजप नेत्यांची झालेली बैठक यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली. अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर महाराष्ट्र महाविकासआघाडी सरकारवर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे. भाजपा मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही शिल्लक नाही, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले होते. याला भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या
भाजपाची ऊर्जा अक्षय आहे
आम्ही बोललो की वायफळ बडबड? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी? भाजपाची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपाच्या रक्तातच नाही! महाविकासआघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पलटवार केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेविषयी भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रिमॅच्युअर आहे. मराठा आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल, तर राज्याने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थानपना करून त्यामार्फत पुढील कारवाई करायला हवी, असे यापूर्वीच एका समितीने सांगितले आहे. ती कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. तरीदेखील भेटले ते चांगले आहे. पुढे त्याचा फायदाच होईल, असे फडणवीस म्हणाले.