मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी झालेला पाहायला मिळत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्याही घटताना दिसत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही लसींचा तुडवडा जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे काही केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. यावरून भाजपने टीका केली असून, लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता, लोकांचा वेळ फुकट का घालवता?, अशी विचारणा केली आहे. (bjp pravin darekar slams bmc over corona vaccination)
मुंबई महानगरपालिकेकडे लसींचा तुटवडा असल्याने गुरुवारी जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा लसीकरण मोहीम खोळंबली आहे. त्यावरून भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे.
लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता
मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र थाटात उघडतात, पण लस नाहीत. लसीकरणाचा पुरता बोजवारा उडाला असून नियोजनाचा अभाव जाणवतो. मुंबई महानगरपालिका लस नाही तर लसीकरण केंद्र का उघडता?, लोकांचा व यंत्रणांचा वेळ फुकट का घालवता?, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
गैरसीयोची जबाबदारी पण मुंबई पालिकेने घ्यावी
स्वतःचे कौतुक करून घेत असताना लसीकरणाचे ढिसाळ नियोजन व मुंबईकरांना होत असलेल्या गैरसीयोची जबाबदारी पण मुंबई पालिकेने घ्यावी, अशी टीका दरेकर यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केली आहे.
मुंबई हायकोर्टाकडून पालिकेचे कौतुक
मुंबई महापालिकेचे कोविड मॅनेजमेंटचं मॉडेल हे फारच प्रभावी सिद्ध झाले आहे. मुंबई महापालिकेने खाजगी रूग्णालयांच्या साथीने आता रहिवासी सोसायट्यांच्या आवारात जाऊन लसीकरण मोहिम सुरु केली आहे. ही निश्चितपणे स्वागतार्ह गोष्ट आहे, अशाच पद्धतीने आता जे घरात अंथरूणाला खिळून आहेत. त्यांच्याजवळ जाऊन प्रशासनाने लसीकरण करायला हवे, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेचे कौतुक केले आहे.