Maharashtra Politics: “गिरे तो भी टांग उपर! अजित पवारांचा अहंकार असा आहे की...”; भाजप नेत्याने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 03:36 PM2023-01-07T15:36:02+5:302023-01-07T15:36:46+5:30
Maharashtra News: अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. त्याऐवजी त्या विधानावर सत्कार स्वीकारले, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले होते. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक होत अजित पवारांवर टीका केली. यातच आणखी एका भाजप नेत्याने अजित पवार यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गिरे तो भी टांग उपर!, असे अजित पवारांचे झाले आहे. विधान चुकल्यानंतर, विरोध झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती.पण अजित पवार यांचा अहंकार असा आहे की आम्ही सगळ्यांच्यावर आहोत! तो अहंकार त्यांच्यातून जायला तयार नाही, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतला.
राजकारणात नवी विकृती आली आहे की काय?
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, अशा प्रकारचे विकृत प्रदर्शन कधीच झाले नाही. एका बाजूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत विधाने करायची आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचे सत्कार समारंभ करायचे. यामुळे राजकारणात नवी विकृती आली आहे की काय, असे वाटायला लागले आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, याबाबत विश्वास पाटील यांनी अनेक संदर्भ दिले आहेत. त्यांच्या म्हणण्याला अर्थ आहे. त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, यावर तो संदर्भ शिक्कामोर्तब करणारा आहे. हा मुद्दा इगो आणि प्रेस्टिजचा न करता भावनिक राजकारण थांबायला हवे. जनतेला विकास हवा आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पुढचा फेब्रुवारी महिना शिंदे सरकार पाहणार नाही, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, सध्याचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे. शिंदे आणि फडणवीस साहेबांच्या क्षमतेने अनेक धाडसी निर्णय घेतले गेले आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या तुलनेत वेगाने निर्णय घेतले आहेत. दोन वर्षच काय पुढील २५ वर्षे आम्ही सत्ते राहू, असा विश्वास प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"