मुंबई - पक्ष वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसऱ्यांचे आमदार-खासदार चोरणं हाच भाजपाचा एककलमी कार्यक्रम असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानंतर आता भाजपाने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "तुम्ही मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे जनतेनं पाहिलं" असं म्हणत निशाणा साधला आहे.
भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. "इतक्या खालच्या दर्जाची टीका मुख्यमंत्री असणाऱ्या माणसावर करणे चुकीचे आहे. शिंदे हे आत्ताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना जरा काम करू द्या, दोन महिने झाले नाहीत तर एवढं पण पोटशूळ होण्याचं कारण नाही. थोडासा संयम बाळगा. गेली अडीच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं, काय दिवे लावले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे" असं म्हणत दरेकर यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच विरोधकांचा डान्सबारवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही असंही म्हटलं आहे.
"हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी वरळीतून राजीनामा द्यावा"
दरेकर यांनी आदित्य ठाकरेंवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. "हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी देखील वरळीतून राजीनामा द्यावा, शिंदे गटाचे 2 आमदार राजीनामे देतील आणि होऊन जाऊ दे एकदाच दूध का दूध, पानी का पानी... तुम्ही एका मतदारसंघामध्ये तीन तीन आमदार करता, बाकीच्या शिवसैनिकांवर अन्याय होतो त्याचं काय? म्हणून तुम्ही द्या राजीनामा, कशाला पाहिजे तीन आमदार... वरळीत सर्व निधी... तुम्ही द्या राजीनामा आणि निवडणुकीला सामोरं जा आम्ही स्वीकारतो आव्हान" असं म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं.
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि भाजपासोबत सत्तास्थापन करणे या गोष्टींमुळे शिवसेना आणि भाजपसोबत आता शिंदे गटाशी संघर्ष वाढलेला दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर ठाकरी शैलीत निशाणा साधला आहे.
काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे
चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते का बघा. तसे आता कुणी माणसे आमदार-खासदार गायब झाले, तर त्यांनाही तिथेच बघावे लागेल. स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. सगळे आमदार, खासदार, नेते, स्वप्न चोरायचे. मग तुमचा पक्ष आहे की चोरबाजार, अशी खोचक विचारणाही उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केली. तसेच या कार्यक्रमात उपस्थित कुणीतरी ठाण्याचा उल्लेख करताच, ठाण्यामध्ये तर काही बोलूच नका. पण तिथेही कधीकाळी असे होते. मी लहानपणापासून ऐकलेय. मला कुतुहल होते. मला खरेच एकदा जायचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.