मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढत चालला आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे. (bjp pravin darekar slams thackeray over corona vaccine global tender)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर दिला जात असताना, लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरद्वारे सुमारे एक कोटी लसीच्या डोसची मागणी करण्यात येत आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट केले आहे.
“पंतप्रधान मोदी, आतातरी जागे व्हा”; सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून केंद्रावर टीका
टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?
महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगण यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली
कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली आहे. १८ मे ही टेंडर भरण्याची शेवटची तारीख असेल. वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना ३ आठवड्यात लसींचा साठा द्यावा लागेल. तसंच त्यांना ICMR आणि DGCI च्या नियमावलीचे पालनही करावे लागेल. गरज भासल्यास त्यांना कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी लागेल. कोरोना लसींची परिणामकारकता टेंडरच्या नियम व अटीनुसार ६० टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये. तसेच आम्ही त्यांना कोणतेही आगाऊ पेमेंट करणार नाही. कंपन्या वेळेत लस देऊ शकल्या नाहीत तर आम्ही त्यांना दंड करू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन
दरम्यान, राज्यात बुधवारी ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात बुधवारी ४६ हजार ७८१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ५ लाख ४८ हजार १२९ वर पोहोचली आहे. राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.