मुंबई - उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना फोडण्याचा नाही, तर हा संपविण्याचा डाव आहे. मात्र, शिवसेना पुरुन उरेल आणि संपविणाऱ्यांना पाताळात गाडेल, अशा शब्दांत भाजपावर हल्लाबोल केला. "अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण आजचा जो प्रयत्न आहे तो फोडण्याचा नाही, तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नातं त्यांना तोडायचं आहे. पण नातं जर तोडायचं असेल तर हे जे आज स्वत:ला मर्द समजत आहेत. हे बंडखोर नाहीत ते हरामखोर आहेत. त्यांनी हरामीपणा केला आहे. तुमच्यात एवढी जर मर्दुमकी असेल तर निवडणुकीला सामोरं जा" असं उद्धव ठाकरे म्हणाले. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने संपत असतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. "कोणी कोणाला संपवत नसतं. ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला आहे, त्या विचारधारेशी प्रतारणा केल्यावरच तो पक्ष संपत असतो. हा देशातला इतिहास आहे. हिंदुत्व शिवसेनेची मूळ विचारधारा होती, त्याला तिलांजली दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आयुष्यभर हिंदुत्वाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भूमिकेचा तिरस्कार केला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या मांडील मांडी लावून बसलात, त्याचवेळी शिवसेनेची अधोगती सुरू झाली. त्यामुळे कोणी कोणाला संपवत नाही, जो तो आपल्या कर्माने, कृत्यानं संपत असतो" असं प्रवीण दरेकर य़ांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला देखील लगावला आहे. पुन्हा नव्याने शपथपत्र घेऊन पक्ष घट्ट करण्याचा प्रयत्न आहे. पण सत्ता असताना जनतेत गेले असते, फिरले असते तर गठ्ठे करण्याची वेळ आली नसती असं म्हटलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून ती २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. यावरून आता भाजपाने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात"
"उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे दोन फोटो ट्वीट करत जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची संजय राऊतांनीच घेतलेली आधीची मुलाखत आणि आताची मुलाखत असे दोन फोटो राणे यांनी ट्वीट केले आहेत. सत्ता होती तेव्हाची मुलाखत आणि सत्ता गेल्यानंतरची मुलाखत असं म्हणत त्यांनी ते दोन फोटो शेअर केले आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून "उजेडात बाळासाहेबांची गरज नव्हती, नेहमी अंधारात बाळासाहेब आठवतात" असं म्हटलं आहे.