मुंबई - नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. याच दरम्यान भाजपा नेते प्रवीण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?" असा सवाल आता विचारला आहे. प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले" असं दरेकरांनी म्हटलं आहे.
नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. तर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर या घटनेमुळे ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे.