गोपीनाथ मुंडे असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती, असे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जालन्यात झालेल्या ओबीसी एल्गार सभेत म्हटले होते. कालच्या सभेत सर्व पक्षांचे ओबीसी नेते एकाच व्यासपीठावर आले होते. परंतू, भाजपा नेत्या पंकजा मुंडे आल्या नव्हत्या. याचे कारण पंकजा यांनी स्पष्ट केले आहे.
अंबड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार सभेला पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती पहायला मिळाली. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने या सभेला कोणी जायचे हे ठरविले होते. तसेच आजचा पीच छगन भुजबळ यांचा होता, त्यामुळे मी या ठिकाणी गेले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच मला ओबीसींच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण, मानपान देण्याची गरज नाही. बहुजनांच्या संघर्षासाठी निमंत्रणाची गरज नाही. मी माझी ओबीसी आरक्षावर भुमिका आधीच मांडलेली आहे, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.
आज मराठा समाजाचा नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. त्यांना अभ्यास कळत नाही. आम्हाला आरक्षण घटनेने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. मंडल आयोगाने दिले. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, सासरच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका भुजबळांनी केली होती.
या सभेला व्यासपीठावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे, बबनराव तायवाडे, आ. राजेश राठोड, देवयानी फरांदे व इतर ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती.
पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीची चर्चाओबीसी एल्गार सभेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण अनेकांनी काढली. त्यांचे छायाचित्र घेऊन अनेकजण या सभेत सहभागी झाले होते. परंतु, या सभेला माजी मंत्री पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.