अतुल कुलकर्णी / मुंबईनोटबंदीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला अपयश आले, तर उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल. तो होऊ नये, म्हणून कोणत्याही स्थितीत शिवसेनेसोबत युती करा, असा दबाव केंद्रीय नेतृत्वाने राज्यातल्या नेत्यांवर टाकल्याने भाजपाची भाषा मवाळ झाली आहे. भाजपाने मुंबईत केलेल्या सर्वेक्षणातही शिवसेना आघाडीवर राहील, अशी माहिती आहे.गेली दोन वर्षे भाजपाकडून शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक मिळाली. त्यामुळे सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावण्याचे काम शिवसेनेने केले. नोटाबंदीनंतर मुंबईच्या आर्थिक जगतात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांसह गुजराती समाजाचे व्यापारीही भाजपाच्या विरोधात गेल्याची माहिती वरिष्ठ पातळीवर मिळाली आहे. गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका ४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहेत, पण सगळ्यांचे निकाल हे मार्च महिन्यात जाहीर होणार आहेत. मात्र, मुंबई पालिकेचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात उत्तर प्रदेशात चार टप्प्यांत मतदान होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत जर भाजपाला अपयश आले, तर त्याचा वाईट परिणाम त्या चार टप्प्यांवर होईल, अशी भीती भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वास वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शिवसेनेसोबत युती करा, असे सुचवले गेल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. जर युती झाली नाही आणि निकालानंतर शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर सरकारपुढील डोकेदुखीतही वाढ होईल. आजपर्यंत शिवसेनेवर भाजपाने जो दबाव निर्माण करून ठेवला होता, त्यालाही तडा जाईल. दुसरीकडे शिवसेना जर स्वतंत्र लढली, तर किमान ९५ ते ११० जागा जिंकू शकेल, असे पक्षाचे सर्वेक्षण सांगत आहे.
युतीसाठी भाजपावर दिल्लीतून दबाव?
By admin | Published: January 25, 2017 3:08 AM