मुंबई - उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर उघड मतदान घेऊन थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. तर भाजपसमोर बहुमत सिद्ध करण्यासाठी अशक्यप्राय आव्हान उभे ठाकले आहे.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार अशी स्थिती असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार एकटे पडले. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
दरम्यान विधानसभेत तातडीनं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली. आज यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत.
थेट प्रक्षेपणामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमदारांची गोची होणार आहे. अर्थात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास आमदारांच्या प्रतीमेला त्यांच्या मतदार संघात धक्का बसणार आहे. त्यामुळे आमदारांच्या मनात बंडखोरी करण्याची हिंमत होणे अवघड आहे. येथेच भाजपसाठी अडचण निर्माण होऊ शकते. याचे कारण म्हणजे, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्याकडे 162 आमदारांचे बहुमत आहे. तर भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. त्यासाठी तिन्ही पक्षातील किमान 25 आमदारांनी बंडखोरी करणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.