सदानंद नाईक,
उल्हासनगर- रिपाइंशी परस्पर युती केल्याने नाराज असलेल्या शिवसेनेने उल्हासनगर पालिकेत महायुती अशक्य असल्याचे सांगितल्याने आणि भाजपाच्या बालेकिल्ल्यात मेळावे घेण्यास सुरूवात केल्याने अखेर भाजपाने शिवसेनेला अधिकृतपणे युतीचा प्रस्ताव पाठवला. मात्र जागावाटपावरून असलेला तिढा, अन्य पक्षांच्या अपेक्षांमुळे युतीच्या चर्चेची केवळ औपचारिकता पार पाडली जाईल. प्रत्यक्षात दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी खासगीत मान्य केले. साई पक्षाने सत्तेत सहभागी होताना दिलेली आश्वासने न पाळल्याने शिवसेना-भाजपाचे संबंध धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने साई पक्षाच्या सहभागास शिवसेनेचा विरोध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या महायुतीत साई पक्ष असण्याबाबतही संभ्रम कायम आहे.युती तुटल्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून भाजपाने ही खेळी खेळली आहे. जागावाटपाचे, मित्रपक्षांना सहभागाचे, आपापल्या फॉर्म्युल्याचे गुऱ्हाळ पुढील आठवडाभरात सुरू राहील. त्याला दोन-तीन दिवसात सुरूवात होईल, असे या नेत्यांनी सांगितले. भाजपाचे निवडणूक प्रभारी दिगंबर विशे यांनी युतीची चर्चा होऊन शांततेत जागावाटप पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. उल्हासनगरात भाजप-शिवसेना व रिपाइं हे नैसर्गिक मित्रपक्ष असून पालिकेवर या युतीची सत्ता येईल. काही कारणास्तव युतीची बोलणी थांबली असली, तरी दोन-तीन दिवसात पुन्हा चर्चा होऊन जागावाटप केले जाईल, असे ते म्हणाले. अर्थात मुंबईच्या निर्णयावर येथील युतीचा निर्णय अवलंबून असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी भाजपाच्या एका नेत्याकडून युतीच्या बोलण्यांसाठी फोन आल्याचे सांगितले. मात्र महायुतीत स्थानिक साई पक्ष असणार की नाही, याबाबत शिवसेना-भाजपा कोणीही स्पष्टपणे सांगण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)>भाजपा-रिपाइंची युती ही नैसर्गिकचभाजप व रिपाइंत नैसर्गिक युती असल्याने त्यांच्यात आधी जागावाटप झाले. महापालिकेची सत्ता काबीज करायची असेल, तर शिवसेना-भाजपाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असा सूर विशे यांनी लावला. यापूर्वी दोन्ही पक्षाच्या जागावाटपाच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दोन-तीन दिवसांत बोलणी होऊन जागावाटप केले जाईल, असे ते म्हणाले.