मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपच्या वतीने त्यांच्याविरुद्ध शुक्रवारी राज्यभर निदर्शने करण्यात आली.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीत आरक्षण संपविण्याची भूमिका मांडली, या निमित्ताने काँग्रेसचा छुपा अजेंडा उघड झाला असा आरोप भाजपच्या नेत्यांनी आंदोलनादरम्यान केला. आरक्षण संपविणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच आहे. राहुल गांधी यांच्या ओठातून ती व्यक्त झाली, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला येथे आंदोलनाचे नेतृत्व करताना सांगितले.
जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन, पुणे येथे मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रपूर येथे मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, नंदुरबारमध्ये डॉ. हीना गावित, विजय चौधरी, सोलापूर येथे आमदार सुभाष देशमुख, सांगली येथे आमदार सुधीर गाडगीळ, नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
काँग्रेस आक्रमक, रास्ता रोको करीत निषेध
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना भाजप नेते माजी आमदार तरविंदरसिंग मारवा यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा निषेध करीत नागपूर शहर काँग्रेसने शुक्रवारी व्हेरायटी चौकात तीव्र आंदोलन केले. यावेळी मारवा यांना अटक करण्याची मागणी करीत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला.
घोषणाबाजी
राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हाताला काळ्या फिती बांधून भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी हे चैत्यभूमीवर जाऊन माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन राज्यभर असेच सुरू राहील, असे भाजपच्या नेत्यांनी जाहीर केले.
राहुल गांधी तसे कधीही बोलले नाहीत : थोरात
आरक्षण बंद करणार असे काँग्रेस नेते राहुल गांधी कधीही बोललेले नाहीत. त्यामुळे भाजपचे नेते नेमके कशासाठी आंदोलन करत आहेत? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. राहुल गांधींची भूमिका ही आरक्षणाच्या बाजूची आहे. उलटपक्षी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी आणि सर्व समाज घटकांना न्याय द्यावा अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, भाजप स्वत:च फेक न्यूज पसरवून आंदोलनाची नौटंकी करीत आहे, असे थोरात यांनी एक्स समाजमाध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
भाजपचे नेते हे सत्यता पडताळून पाहण्याची कोणतीही तसदी घेत नाहीत. त्यांना अज्ञानात आनंद घेण्याची सवय लागली आहे. भाजपच्या या फेक नॅरेटिव्हला सर्वसामान्य जनता भुलणार नाही. भाजपच संविधान आणि आरक्षणविरोधी आहे हे सत्य जनतेला आता माहिती झाले आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.