महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासांत १५०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या मतदानाच्या वेळी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे दिसून आले. विधान परिषदेच्या आता सुरू असलेल्या निवडणुकीत देखील एक-एक मत अमूल्य आहे. भाजपाचे ४ तर महाविकास आघाडीचे ५ उमेदवार सहज निवडून येतील याबाबत शंका नाही. पण १०व्या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात थेट लढत आहे. यासाठी प्रत्येक मताची आवश्यकता लक्षात घेता पुण्याच्या आमदार मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असतानाही मतदानासाठी मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांनी पक्षनिष्ठा सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून दिले. त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.
राज्यसभेच्या निवडणुकी वेळी कर्करोगाशी झुंज देत असलेले भाजपाचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी आले होते. त्यांच्या एका मताने भाजपाचा उमेदवार विजयी झाला होता. तेव्हा हा विजय या दोन आमदारांना समर्पित करण्यात आला होता. आजदेखील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक या कर्करोगाशी झुंज देत असताना आणि प्रकृती काहीशी अस्वस्थ असतानाही विधान भवनात दाखल झाल्या आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी, "प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्वाची!" असे विधान करत त्यांनी साऱ्यांचीच मने जिंकली. त्या जेव्हा मतदानासाठी पोहोचल्या त्यावेळी सर्व आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांचे स्वागत केले.
मुक्ता टिळक यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत; पाहा VIDEO-
मुक्ता टिळक मतदानासाठी विधान भवनात दाखल होताच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "पक्षासाठी हे मतदान महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठेची लढाई असं लोक म्हणत असतील तरी प्रतिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. प्रकृतीपेक्षाही मतदान महत्त्वाचे आहे. कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्यांना पक्ष अधिक महत्त्वाचा असतो. पक्षाची काही गणिते असतात. त्यामुळे कोणीही आग्रह केला नसला तरी मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानभवनात आले आहे", अशा शब्दांत त्यांनी एबीपीमाझाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर त्या विधानभवनात आपल्या कारमधून उतरल्यानंतर कर्करोगाशी झुंज देत असतानाही मतदान करण्यासाठी हजर राहिल्याने त्यांच्या लढाऊ वृत्तीला साऱ्यांनीच सलाम केला आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्या मतदानासाठी विधानभवनात दाखल झाल्या.
दरम्यान, १० जूनला राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील मुक्ता टिळक या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या लढाऊवृत्तीचे कौतुक करण्यात आले होते.