Radha Krishna Vikhe Patil Taunts Aaditya Thackeray: ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेला गौप्यस्फोट, महाविकास आघाडीची नागपूर येथे होत असलेली वज्रमूठ सभा आणि राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या शक्यतेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे अद्यापही पडसाद उमटताना दिसत आहे. शिंदे गटातील नेत्यांसह भाजप नेत्यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. यावर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे
आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते. एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंचे समर्थन केले आहे. मी आदित्य ठाकरेंना जे काही ओळखते, त्यावरून आदित्य ठाकरे साधा, सरळ आणि सुसंस्कृत मुलगा आहे. त्यांनी घरातील काही अनुभव सांगितला असेल तर तो खराच असेल. तो सुसंस्कृत, चांगला मुलगा आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाला एक प्रकारे पाठिंबा दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"