अहमदनगर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेत अनेकविध मुद्दे मांडले. त्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत ठाम भूमिका घेऊन महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारला ३ मेपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेक स्तरांतून टीका केली जात आहे. यावरून मनसे पक्षातच दोन गट पडलेले दिसले. मात्र, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारला पळता भुई थोडी झाली आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आता मंदिरात दिसू लागले आहेत. यासाठी राज ठाकरे यांचे अभिनंदन, असे कौतुकोद्गार एका बड्या भाजप नेत्याने काढले आहेत.
राज्यातील विविध मुद्द्यांवर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडेच घेतलेल्या भूमिकेबद्दल विखे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना आता जाग आली आहे. आतापर्यंत त्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. मात्र, भाजपाची या सर्व विषयांतील भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे. त्यामुळे भाजपला कोणाचा पुरस्कार करण्याची आवश्यकता नाही, असे विखे-पाटील यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड
अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानासंबंधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, मिटकरी अद्याप माफी मागायला तयार नाहीत. यावरूनच राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड होतो. बेताल आरोप करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपराच आहे. धर्म आणि जातींबाबत वेगवेगळी मुक्ताफळे उधळायची आणि जेव्हा अंगावर येते, तेव्हा क्षमा मागायची. एकाने मारल्या सारखे करायचे आणि दुसऱ्यानं माफी मागायची यासाठी राष्ट्रवादीनं बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणसे पुढे केली आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्याविरोधात टीका केली जात आहे. अमोल मिटकरी यांनी माफी मागावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. केवळ विरोधक नाही, तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनाही मिटकरी यांचे विधान आवडलेले नसून, यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.