Radhakrishna Vikhe Patil Vs Prithviraj Chavan: राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना अन्य मुद्द्यांवरूनही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. सरकार पडण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यावर आता भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सहकार क्षेत्रात घेतलेल्या कडक निर्णयामुळे माझे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ मध्ये पाडले. मला खात्री आहे की माझे सरकार जर पडले नसते. तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि २०१४ मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते. मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी निर्णय घेतला होता. सरकार राहिले नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकले नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवले असते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले
सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनी केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना थेट शब्दांत उत्तर दिले. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला. तसेच काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत, असा थेट हल्लाबोल सुनील तटकरे यांनी केला.