Maharashtra Assembly Election 2024 Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कधी लागणार, निवडणुका कधी होणार आणि मतमोजणी कधी असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षांनी तयारीवर मोठा भर दिला असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी निवडणुकीत कितपत प्रभाव पाडू शकेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या विधानाला महायुतीतील भाजपा मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिस्तीचा पुरस्कार करणारा पक्ष अशी ओळख असलेल्या त्या पक्षातून लोक आता बाहेर पडत आहेत. जुन्या काळातील जनसंघ किंवा भाजपचा कार्यकर्ता संघटनेची चौकट मोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता, त्याचे कारण तेव्हाचे नेतृत्व कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारे होते. आज ही स्थिती राहिलेली नाही. ठराविक लोकांच्या हातात सत्ता ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे लोक बाहेर पडत आहेत, हा अनुभव त्याच पक्षातील एका नेत्याने मला सांगितला. मागील दोन महिने आमच्या पक्षाकडे येणाऱ्या लोकांची आवक वाढली आहे. आमच्याकडे येणारे ८० टक्के लोक भाजपातून येत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले होते. याला भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले.
शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे
ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे इनकमिंग भाजपात होईल. ठाकरे गटातून तर अनेक लोक येतील, मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, या खोचक शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला.
तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले, काय परिवर्तन केले?
तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळाले. तुम्ही काय परिवर्तन केले. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. समन्यायी पाणी वाटपाचे भूत यांच्याच काळात राज्यावर आले. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, असा एल्गार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहील. तुम्ही सत्तेत येणार नाही तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्याचे कारण नाही. कौन बनेगा मुख्यमंत्री असेच काम सध्या त्यांचे सुरू आहे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाना पटोले यांना लगावला.